श्री संत गजानन माऊली चिंतन | Gajanan maharaj Chintan | Madhukar Ganeshpure

श्री संत गजानन माऊली चिंतन: या पोस्ट मधील गजानन माऊलींचे चिंतन हे श्री मधुकर गणेशपुरे यांनी खूप शब्दबद्ध केले आहेत, आणि सर्व गजानन माऊली भक्तांपर्यंत ही रचना पोहचवणे हे मराठीकंटेंट चे ध्येय आहे, मला आशा आहे की या शब्दरचना एक भक्त म्हणून तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही हे गजानन माऊली चिंतन इतर माऊलींपर्यंत नक्की पोचवाल, ।। जय गजानन माऊली ।।

श्री संत गजानन माऊली चिंतन

श्री संत गजानन माऊली चिंतन

चाल : हंबरून वासराले चाटते जवा गाय…

परतूनी शेगावाला, धावते जेव्हा मन….

तेव्हा मला मनामध्ये दिसती गजानन ।

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ॥ धृ ॥

मायबाप करित होते, पायदळ वारी ।

श्रद्धा त्यांची ठाम, एक तूच तारणहारी ।।

महिमा तुझी ऐकून झाले, धन्य बालपण… 

तेव्हा बालपणामध्ये, दिसती गजानन ॥ 

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ॥ १ ॥

शेगांव हि पुण्यभूमि, पावन दरबार । 

सेवाभावी सेवक आणि स्वच्छ कारभार ।। 

चहुकडे दरवळे, भक्तीभावाचे चंदन…. 

तेव्हा चंदनात मला, दिसती गजानन ॥ 

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ॥ २ ॥

कुणी नामजप करे, कुणी पारायण ।। 

कुणी घालून प्रदक्षिणा, स्मरे मनोमन ।। 

प्रसादाने तृप्त होती, सगळे भक्तगण… 

तेव्हा भक्तगणामध्ये, दिसती गजानन ॥ 

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ॥ ३ ॥

कुठे पुजन पादुकांचे-कुठे देणगी दान | 

दर्शनबारी मध्ये होते, जयघोष गुणगान ज्याच्या त्याच्या ओठी, असे मंत्र ‘गण-गण’… 

तेव्हा गण गणामध्ये दिसती गजानन ॥ 

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ॥ ४ ॥

प्रगटदिन, ऋषीपंचमी, रामनवमीचा सण ।।

दिंड्या-पालख्या सवे, हे उत्सवांचे क्षण । 

रोमांचित होऊन जाई, हृदयाचा कण-कण… 

तेव्हा कण-कणामध्ये दिसती गजानन ॥ 

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ।। ५ ।।

भक्तांचे निवास अन् आनंद सागर ।। 

एक-एक सोय, मनःशांतीचे आगर ।। 

सर्वांसाठी खुले, स्वर्गसुखाचे दालन… 

तेव्हा दालनात मला, दिसती गजानन ॥ 

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ॥ ६ ॥

लाखो येती भक्त येथे, दुरुन दुरून ॥ 

राव-रंक भेद जातो-विरून सरून ॥ 

शिस्तीसाठी चहुदिशा, निघते आठवण… 

तेव्हा आठवणीमध्ये दिसती गजानन । 

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ।। ७ ।।

ज्यांच्या मुखी वसे, गुरु गजानन नाम ॥ 

त्यांच्यासाठी शेगाव हेचि, असे चारही धाम । 

कृपा लाभो, त्यांना घडो, नित्य ‘श्री’ दर्शन… 

तेव्हा दर्शनात मला, दिसती गजानन । 

माऊली गजानन ॥ अहो परतूनी ॥ ८ ॥


या पोस्ट सुद्धा तुम्ही वाचायला पाहिजे:Sharing Is Caring:

Leave a Comment