बिश्नोई | Balbharti marathi | इयत्ता सहावी २००७ | Bishnoi

शैलजा ग्रब - (जन्म १९४७) प्रसिद्ध लेखिका. निसर्ग अभ्यासक,

महाराष्ट्रातील वन्यप्राणी, भारतातील वन्यजीवन, प्रमुख भारतीय वृक्ष इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माणसाने आपले जीवन समृद्ध करत असतानाच झाडे, जंगले, सभोवतीचा निसर्ग आणि वन्य प्राणी यांचे संरक्षण करावे हा संदेश या पाठातून मिळतो.

 वळजवळ ५ शतकांपूर्वी राजस्थानात घडलेली ही गोष्ट आहे. जोधपूरपासून २५ किलोमीटर अंतरावर 'खेजदली' नावाचे गाव होते. तेथे राहणारे लोक बिश्नोई समाजाचे होते. सभोवतीची जमीन वाळवंटाची, रखरखीत. बिश्नोई लोकांनी त्या जमिनीत बाभळीची असंख्य झाडे लावली. त्यांचा देव जांबेश्वर. सामान्यतः जांबाजी या नावाने तो ओळखला जायचा, या जांबाजीने २९ आज्ञा दिल्या होत्या, त्यांचे पालन बिश्नोई लोक करीत, त्यामुळेच त्यांना बीस बीस, नोई नऊ असे बिश्नोई नाव मिळाले. या आज्ञा बहुधा झाडांच्या व कन्य प्राण्यांच्या संरक्षणासंबंधीच्या आहेत. त्यांतील दोन प्रमुख आज्ञा अशा आहेत, की कोणतेही हिरवे झाड निर्दयपणे पाडले किंवा तोडले जाऊ नये आणि कोणताही प्राणी ठार मारला जाऊ नये. पिपासार खेड्यांतील ठाकूर लोहाट व हमसानदेवी यांना १४५१ मध्ये पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याचे नाव जांबाजी, लहानपणी तो त्याच्या घरची गाईगुरे चरावयास घेऊन जाई व ती चरत असताना बाभळीच्या सावलीत बसून सुंदरशा काळविटांचे कळप तास न् तास पाहत राही.


१५ व्या शतकाच्या शेवटाला या सबंध भागात मोठा दुष्काळ पडला. एक नव्हे, दोन नव्हे, तर मोजून आठ वर्षे फारच कष्टाची गेली. पहिल्या वर्षी लोकांनी साठवून ठेवलेल्या अन्नावर व गुरांसाठी साठवलेल्या गंजींवर उदरनिर्वाह केला; परंतु दुसरे वर्ष फारच कष्टाचे गेले. तेथे गवताचे एकही पाते दिसत नव्हते. लोकांनी बाभळीच्या शेंगा व बोरांच्या बिया खाल्ल्या. गावेच्या गावे ओसाड दिसू लागली. लोकांनी हजारो काळवीटे मारून खाल्ली. ५० वर्षांपूर्वी एकदा अशाच जबरदस्त दुष्काळाचा तडाखा लोकांना बसला होता; परंतु तेव्हा माणसांना व प्राण्यांना त्यामानाने कमी हाल सोसावे लागले होते. या वेळच्या दुष्काळात माणसांचे हाल व प्राण्यांची कत्तल पाहून जांबाजीला फारच दुःख झाले. आजूबाजूची परिस्थिती पाहून त्याने कित्येक रात्री जागून काढल्या. शेवटी तो झाडाखाली ध्यानमग्न होऊन बसला. त्याला निश्चित मार्ग सापडला. 'या वैराण जमिनीवर पुन्हा एकदा जीवन फुलवायचे असेल, तर माणसाला केवळ त्याच्या आनंदासाठी व गरजांसाठी निसर्ग संपूर्णपणे नष्ट करता येणार नाही. त्याने विचारपूर्वक वागले पाहिजे.' जांबाजीला तेथे पुन्हा एकदा बाभळी, बोरी, खेर, शेंद्री अशा वेगवेगळ्या झाडांनी सृष्टी भरून गेलेली पाहावयाची होती. तसेच तेथे पुन्हा एकदा काळविटांचे कळप बागडत असताना त्याला पाहावयाचे होते. जांबाजीचे विचार सर्वांना मान्य होण्यासारखेच होते. पुढे आपल्या हयातीत त्याने राज्यातील परिसर झाडे लावून हिरवागार करण्याचे कार्य केले; परंतु बिश्नोईच्या हद्दीपलिकडे मात्र सर्व पूर्वीसारखेच चालू होते. वाळवंट पसरतच चालले होते.

तिथे अभयसिंह नावाचा राजा राज्य करत असे. मुरुमांच्या लाल दगडांचा राजमहाल बांधायचे त्याने ठरवले. ते दगड भाजून घ्यावे लागत. त्यासाठी भरपूर सरपण लागणार होते; म्हणून अभयसिंह महाराजांनी त्यांच्या ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना खेजदली परिसरातील झाडे तोडण्याचा हुकूम केला. महाराजांची माणसे झाडे कापण्यासाठी तेथे आली, तेव्हा बिश्नोई लोकांनी त्यांना खूप विरोध केला; परंतु महाराजांच्या माणसांनी त्यांच्या शांततापूर्ण विरोधाला दाद न देता मजुरांना झाडे कापण्याचा हुकूम केला. बिश्नोईंनीदेखील तेवढ्याच जिद्दीने त्या झाडांचे संरक्षण करावयाचे ठरविले. त्यांच्यामध्ये अमृता नावाची एक शूर महिला होती. तिने मजूर कापत असलेल्या झाडाला विळखा घातला. मजुरांनी तिच्यावरदेखील कुन्हाड चालविली. त्यानंतर तिच्या तीन मुलींनीही तिचे अनुकरण केले. आंदोलन चिघळले. कित्येक बायका-पुरुषांनी व मुलांनी पटापट झाडांना विळखे घालावयास सुरुवात केली. त्या दिवशी आपली हिरवी संपत्ती वाचविण्याच्या प्रयत्नात ३६३ बिश्नोईंनी आपल्या प्राणांचे बलिदान केले.

बिश्नोई  | Balbharti marathi   | इयत्ता सहावी २००७ | Bishnoi

नंतर मात्र महाराजांची माणसे घाबरून गेली. त्यांनी महाराजांना सर्व हकिकत सांगितली. या कत्तलीबद्दल खेद प्रदर्शित करण्यासाठी राजा स्वतः त्यांच्या गावात गेला. त्याने बिश्नोईंना वचन दिले, की यापुढे त्यांच्या हद्दीतील कोणतेही झाड तोडण्यात येणार नाही किंवा प्राण्यांची हत्या करण्यात येणार नाही. कुणीही हिरवे झाड कापत असल्यास वा प्राणी मारत असल्यास त्याला अटकाव करण्याचा अधिकार कोणत्याही बिश्नोईला आहे, असे राजाने जाहीर केले. त्यांना अनेक प्रकारच्या करांतूनही सवलती देण्यात आल्या. आज बिश्नोईंनी घालून दिलेल्या या उदाहरणाचे अनुकरण आपण सर्वांनी केले पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या